SBI Mutual Fund | इक्विटी म्युच्युअल फंड मार्केटमध्ये अशा अनेक योजना आहेत, ज्यात गुंतवणूकदार पैसे गुंतवून कोट्यधीश झाले आहेत. मागील कामगिरी पाहिली तर एसबीआयकडून चालविण्यात येत असलेल्या योजनांपैकी एक योजना म्हणजे एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंड. ही सुमारे २८ वर्षे जुनी योजना असून सुरू झाल्यापासून गुंतवणूकदारांसाठी परताव्याचे यंत्र बनली आहे.
गेल्या 20 वर्षांत या फंडाने 21 टक्के सीएजीआर परतावा दिला आहे. या कालावधीत एक लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक 48 लाख रुपये झाली. तर 5000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीचे मूल्य 1.15 कोटी रुपये झाले आहे. खरं तर इक्विटी किंवा इक्विटीशी संबंधित योजनांमध्ये गुंतवणुकीच्या इतर पर्यायांपेक्षा जास्त परतावा मिळण्यास अधिक वाव असतो
एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंडाची कामगिरी
एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंडाने 20 वर्षांत गुंतवणूकदारांना 21 टक्के सीएजीआरने परतावा दिला आहे. या कालावधीत ज्यांनी या योजनेत गुंतवणूक केली होती आणि 20 वर्षे वाट पाहिली होती, त्यांच्या पैशात 48 पटीने वाढ झाली आहे. येथे 1 लाखांची गुंतवणूक वाढून 48 लाखांहून अधिक झाली. तर दरमहिन्याला 5000 रुपयांची एसआयपी करणाऱ्यांचे पैसे वाढून 1.15 कोटी रुपये झाले.
15 वर्षांचा विचार केला तर फंडाने गुंतवणूकदारांना 14 टक्के सीएजीआरवर परतावा दिला आहे. या कालावधीत दरमहा 5000 रुपयांची एसआयपी करणाऱ्यांचे पैसे वाढून 33 लाख रुपये झाले. तर ज्यांनी या योजनेत गुंतवणूक केली होती आणि 15 वर्षे वाट पाहिली होती, त्यांच्या पैशात जवळपास 6.7 पट वाढ झाली आहे.
या योजनेने 10 वर्षांत 18.60 टक्के सीएजीआरने परतावा दिला आहे. 10 वर्षांत दरमहा 5000 रुपयांची एसआयपी करणाऱ्यांचे पैसे वाढून 15 लाख रुपये झाले. तर ज्यांनी या योजनेत गुंतवणूक केली होती आणि 10 वर्षे वाट पाहिली होती, त्यांच्या पैशात 5.51 पटीने वाढ झाली आहे.
लाँच झाल्यापासून मोठा परतावा मिळतोय
एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंड योजना सुरू झाल्यापासून गुंतवणूकदारांसाठी परतावा देणारी मशीन ठरली आहे. ही योजना २८ फेब्रुवारी १९९३ रोजी सुरू करण्यात आली आणि तेव्हापासून त्याचा परतावा १५% सीएजीआर आहे. 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत फंडाची एकूण मालमत्ता 5,362 कोटी रुपये होती. तर या तारखेपर्यंत खर्चाचे प्रमाण २.११ टक्के होते. या योजनेत किमान ५०० रुपयांपासून एसआयपी सुरू करता येते. त्याचबरोबर कमीत कमी 5000 रुपयांची एकरकमी गुंतवणूक करता येते.
सर्वोत्कृष्ट आणि वाईट कामगिरी
एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंडाची सर्वोत्तम कामगिरी ९ मार्च २००९ ते ११ मार्च २०१० दरम्यान होती. या कालावधीत फंडाने १०९ टक्के परतावा दिला आहे. ४ डिसेंबर २००७ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत फंडाची कामगिरी सर्वात वाईट होती. या कालावधीत त्याने ५८.३७ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.
कोणत्या शेअर्समध्ये पैसे गुंतवतात?
एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंड शेअर बाजारात लार्जकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. आयसीआयसीआय बँक, पेज इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, न्यूव्होको व्हिस्टास, एसबीआय, इमामी, इन्फोसिस, सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्स, शीला फोम, इंडियन हॉटेल्स आणि रिलॅक्सो फुटवेअर या म्युच्युअल फंडांच्या टॉप होल्डिंग्सचा समावेश आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Post a Comment